माजी मंत्र्यांनीही सोडला उद्धव ठाकरेंचा हात; मराठवाड्यातील मोठा चेहरा शिंदे गटात
जालन्याचे माजी आमदार आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दिल्लीत त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.
नवी दिल्ली : जालन्याचे माजी आमदार आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दिल्लीत त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.
जालन्याचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्यस्थी करून फायरब्रँड नेता अशी ख्याती असलेल्या खोतकरांना शिंदे गटात खेचलंय. यावेळी शिवसेना खासदार धैर्यशिल माने, हेमंत पाटील तसंच भाजप खासदार संजयकाका पाटीलदेखील उपस्थित होते.
शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत वेगळी भूमिका घेतली. एकनाथ शिंदे यांनी या गटाचे नेतृत्व केले. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राजकीय मैत्री नको ही भूमिका आमदारांनी घेतली होती. शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारही शिंदे गटात सहभागी झाले. आता शिवसेनेचे स्थानिक नेतेही शिंदे गटात सहभागी होत असल्याने उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.