बीड : संपूर्ण मराठवाड्यातील जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान भक्ती गडावर चोरी झाली आहे. या प्रकरणातील आरोपीना पोलिसांनी अवघ्या दहा तासात अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडकरांचे भगवानगड हे समीकरण फार जुने आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा दरवर्षीचा दसरा मेळावा याच भगवान गडावरून होत असे. मात्र त्यांच्या जाण्यानंतर भगवान गडाचे मुख्य पुजारी नारायण शास्त्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात वाद निर्माण झाला होता. 


या वादानंतर पंकजा मुंडे यांनी संत भगवानबाबा यांची मूर्ती येथून हलवून ती भगवान बाबा यांच्या मूळ गावी सावरगाव येथे स्थापन केली. तेव्हापासून हे स्थान भगवान भक्ती गड म्हणून ओळखले जाते.


याच भगवान भक्ती गडावरील तीन दानपेट्या काही अज्ञात चोरटयांनी चोरल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली. यावेळी पळून जाणारे चोरटे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. 


आपल्या मागे पोलीस लागल्याचे पाहून चोरटयांनी तीन दानपेट्यांपैकी दोन दानपेट्या विहिरीत टाकून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्या चार चोरांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी तीस हजारांसह स्कारपीओ कार जप्त केली आहे.