भाजप आमदाराच्या कंपनीने थकविले कोरोना योद्ध्याचे वेतन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात कुणाचेच वेतन थांबवू नका, असे आवाहन केले होते.
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर: लातूर महापालिकेने समाजकल्याण विभागाचे वसतिगृह कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहित केले आहे. त्याठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा राजाराम बुरजडे हा कोविड सेन्टरमध्ये कोरोना योद्ध्यासारखं करतोय. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून कंपनीने त्याचा पगार थकवला आहे. राजाराम बुरजडे हा मुंबईच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा कर्मचारी आहे. ही कंपनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मालकीची आहे. एकीकडे पंतप्रधान कोरोना काळात कुणाचेच वेतन थांबवू नका असे सांगत असताना भाजप आमदाराच्या कंपनीनेच एका कोरोना योद्ध्याचा पगार थकविल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुंबईच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत लातूरच्या समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय वसतिगृहात राजाराम सुरक्षारक्षक म्हणून गेल्या वर्षभरापासून काम करतोय. सध्या हे वसतिगृह कोविड केअर सेंटरसाठी लातूरच्या महानगरपालिकेने अधिग्रहित केलं आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक असलेला राजाराम बुरजडे हा कोविड केअर सेंटरशी जोडला गेला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीना या सेंटरमध्ये ठेवण्यात येतं.राजारामची नेमणूक सुरक्षा रक्षक म्हणून असली तरी या सेंटरमधील लोकांचे सर्व कामं करतो. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना ऍम्ब्युलन्स बोलावून डेडिकेटेड कोविदा केअर सेंटरमध्ये पाठवण्याचे कामही तो करतो. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीने राजारामचा पगार केला नसल्याचा आरोप राजारामने केलाय. वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपयोग झाला नसल्याचे राजारामने सांगितले.
राजारामची कहाणी समोर आल्यानंतर लातूरच्या महापौरांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. कोविड सेंटरमधील काम पाहून लातूर महापालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राजारामला मनपाच्या सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले आहे.यावेळी विक्रांत गोजमगुंडे यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यावरही टीका केली. देशाचे प्रमुख व्यक्ती सांगतात पगार थकवू नये. असे असताना त्यांच्या पक्षाचे व्यक्ती असे करीत असतील तर निराशाजनक आहे. कोरोना काळात अनेक जण पुढे येत नसताना कर्त्यव्याच्या पुढे जाऊन सेवा देत आहेत. अशा कर्मचाऱ्यांचे पगार थकविणे दुर्दैवी आहे. ते एका पक्षाचे असल्याचे समजत अशा वेळेस अशा घटना न होता अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.