शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान तातडीने द्यावे या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रमुख विजयकुमार घाडगे पाटील हे गेल्या ७ दिवसांपासून औसा तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज अनेक पक्ष-संघटनांनी औसा शहर बंद ठेवलं होतं. औसा शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवल्या होत्या. या उपोषणाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. 



तसेच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामीण भागातून शेतकरी, नागरिकानी मोठी गर्दी औसा तहसील कार्यालयापुढे केली होती. पावसाअभावी सर्वच पिकं शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यामुळे आता शासनाच्या मदतीशिवाय शेतकरी उभा टाकणे अशक्य असल्यामुळे आपण उपोषण करीत असल्याचे विजयकुमार घाडगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. 


दरम्यान या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या मराठवाडा बंदची हाक छावा संघटनेने हाक दिली आहे.