Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.  ऐन लग्न समारंभाच्या काळात पावसाने थैमान घातल्याने वऱ्हाडी मंडळींची फजिती झाली. नवरदेव आणि वऱ्हाड्यांवर ताडपत्री बांधून वरात काढण्याची वेळ आली. परभणीत ही लग्नाची अजब वरात निघाली.  दुचाकी उचलून तर चार चाकी ओढून काढण्याची वेळ आली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिल आणि मे महिना हा लग्नाचा सिजन असतो. मात्र, याच लग्न सोहळ्यांमध्ये आता पावसाचे विघ्न येत आहे.  ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत असल्याने वऱ्हाडी मंडळीची चांगलीच दमछाक होत आहे. पाऊस आल्यावर मोठी तारांबळ होत आहे.  लग्न सोहळ्याचे  व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 



परभणी जिल्ह्यातील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नवर देवाची वरात निघाली असताना अचानक पाऊस आल्याने वधू पित्याने कापडी ताडपत्री झाकून नवरदेव आणि त्यांच्या मित्राला मंदिरापर्यंत पोहोचवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कापडी मंडप टाकून शेतात लग्न आयोजित केले होते. येथे मुसळधार पाऊस झाल्याने शेतात चिखल झाला. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची काही वाहने उचलून तर काही वाहने ट्रॅक्टरने ओढून शेता बाहेर काढल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 


धार्मिक कार्यक्रम सुरू असताना मंडप उडाला, भाविक सुखरूप


वादळी वारे आणि मुसळधार अवकाळी पावसामुळे एका धार्मिक कार्यक्रमात गोंधळ उडाला. मंडप उडाल्याने भाविकांची धावपळ झाली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ही घटना घडली. महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त कामजळगा येथे लिंगायत समाजाच्या शरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोकळ्या जागी मोठा मंडप टाकून हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण दुपारी वादळी वारे आणि अवकाळी पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्यामुळे मंडप उडाला. खुर्च्या अस्ताव्यस्त पडल्या. अनेक ठिकाणी मंडप फाटला. मुसळधार अवकाळी पावसामुळे चालू असलेला कार्यक्रम बंद करून सर्वांना मिळेल तिथे आडोसा घ्यावा लागला. सुदैवाने कुणी जखमी झाले नाही.


शहापूरमध्ये तुफान पाऊस 


कसारा परीसरात दुपारच्या सुमारास प्रचंड वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. मुबंई-नाशिक महामार्गावर प्रवास करणाऱ्या चालकांना समोर काही दिसत नसल्यामुळे वाहने बाजूला थाबंवावी लागली.