औरंगाबादमध्ये आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या
सकाळपासून शांततेत सुरूवात झालेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले.
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. सकाळपासून शांततेत सुरूवात झालेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. वाळूज भागातही जमाव आक्रमक झाला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना हवेत अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडव्या लागल्या. जमाव पांगविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज केला. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे समोर आलंय. यामध्ये एक खाजगी बस आणि १ पोलीस व्हॅन आंदोलनकर्त्यांनी जाळल्याचे सांगण्यात येतंय.
रास्ता रोको
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको करून मुंडन आंदोलन केलं. जालना शहरासह जिल्ह्यातील आठही तालुक्यात या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील बससेवा,शाळा,महाविद्यालये आणि दुकाना बंद ठेवण्यात आली. आरक्षणाची मागणी करत आंदोलक जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी टायर जाळले.. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालीये. आंदोलकांनी बदनापूर तालुक्यातील दाभाडी, फुलंब्री-राजूर तसचं भोकरदन-जाफ्राबाद रस्त्यावर टायर पेटवल्यानं वाहतुक विस्कळीत झाली.
तात्काळ आरक्षणाची मागणी
लातूर जिल्ह्यातही मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदमध्ये काँग्रेस आमदार अमित देशमुखही रस्त्यावर उतरले. सरकारने तात्काळ आरक्षण जाहीर करावे अन्यथा सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असावा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.बीड जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली व्यापारी, उद्योजक, सर्वसामान्य नागरिक यांनी आपले व्यवहार बंद ठेवले . जिल्ह्यातील सर्वच शाळा,महाविद्यालये देखील बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.