कोरोनाला अक्षरशः लोळवलं! वय ९८, स्कोअर १८ अन् ऑक्सिजन ७० होता तरीही जगण्याची जिद्द होती...
दिलासादायक आणि आत्मविश्वास निर्माण करणारी घटना समोर आली आहे.
विष्णू बुरगे, झीमीडिया, बीड : कोरोना संसर्गामुळे उपचारादरम्यान स्कोअर दहाच्या पुढे आणि ऑक्सिजन लेव्हल ९० च्या आत आली की जणू काही सगळे संपले असेच वातावरण, चर्चा होतात. यातही दिलासादायक आणि आत्मविश्वास निर्माण करणारी घटना समोर आली आहे.
वय ९८ पूर्ण, एचआरसीटी स्कोअर १८, रक्तात कोरोना विषाणूचा प्रसार अधिक झालेला, ऑक्सिजन लेव्हल ७० च्या घरात अशा गंभीर परिस्थितीतून डॉक्टरांची शर्थ, रुग्णाचा आत्मविश्वास, उपचाराला प्रतिसादामुळे गंगधर नारायण बडे यांनी कोरोनाला लोळवण्यात यश मिळविले. 98 वर्ष वय असताना कोरोना चा लढा कसा जिंकला पाहूयात एक विशेष रिपोर्ट
हे आहेत बीड जिल्ह्यातील चोपनवाडी गावचे गंगाधर बडे यांना आयुष्यात तिसऱ्यांदा दवाखान्याची पायरी चढावी लागली. दोनदा अपघातामुळे आणि आता कोरोनाच्या संसर्गामुळे! पण, तिनही घटनांत त्यांचाच विजय झाला हे विशेष.... गंगाधर बडे यांचा मुलगा श्रीधर बडेंना संसर्ग झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले. २१ एप्रिलला त्यांचीही चाचणी पॉझिटीव्ह आली. परिचारिका असलेला त्यांचा नातू रतन व नातसुन प्रियंका दोघांनीही तपासण्या करुन घरीच त्यांच्यावर उपचार सुरु केले. तेव्हा त्यांचा एचआरसीटी स्कोअर शुन्य होता. पण, त्यांचा ताप कमी होत नसल्याने आणि ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याने त्यांना लोखंडीच्या जम्बो कोविड रुग्णालयात दाखल केले.
यावेळी त्यांच्या सीटी स्कॅनचा स्कोअर नऊ आला आणि त्यांचा ताप वाढून त्यांची ऑक्सिजन लेव्हल हळुहळु कमी होऊ लागली. त्यामुळे त्यांना २६ एप्रिलला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयातील पाच क्रमांकाच्या वार्डमध्ये दाखल करण्यात आले.
त्यांच्या पुन्हा सर्व तपासण्या केल्या असता सीटी स्कॅन स्कोअर १८, तर रक्तांच्या तपासण्यात (एलडीएच, सीआरपी, आयएल ६) रक्तात संक्रमण अधिक झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांची ऑक्सिजन लेव्हल देखील घसरुन ७० च्या घरात आली होती. डॉक्टरांपुढेही आव्हान होते. पण, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर गंगाधररावांना कोरोनामुक्त करण्यात यश मिळविले. कोरोना झाला असला तरी गंगाधरराव खचले नाही आणि आज ते कोरोनाला हरवून ते घरी परतले.
ऑक्सीजन लेव्हल कमी झाला आणि सिटीस्कॅन स्कोर जास्त आहे. या भीतीने अनेक नातेवाईकांची दमछाक होत आहे तर रुग्णांसाठी डॉक्टरांची तारांबळ उडत आहे अशातच गंगाधर बडे यांनी 98 वर्ष वय असताना कोरोना वर मात केली इच्छाशक्ती असेल तर कोरोना ऑक्सीजन लेवल आणि सिटी स्कॅन स्कोर हा काही असला तरी बरं होऊ शकत हे त्यांनी दाखवून दिले
डॉ. इरा ढमढेरे सांगतात...
वयाचे 98 वर्ष असणारे आजोबा आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले दाखल झाले. त्यावेळी त्यांचा सिटी स्कोर 18 आणि ऑक्सिजन लेवल 70 हून कमी असताना देखील बडे यांनी कोरोना वरती मात केली आहे. घाबरून न जाता त्यांनी कोरोनाचा सामना केला आणि ते डिस्चार्ज झाल्यानंतर कुठलाही न आधार घेता स्वतः चालत गेले त्यामुळे कोरोना झाला तरी घाबरून जाऊ नका 98 वर्षाचे आजोबा जर बरे होऊ शकत असतील तर सर्वजण बरे होऊ शकतात त्यामुळे घाबरून जाऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं.