विष्णू बुर्गे, झी मीडिया, बीड : एकीकडे वृद्धाश्रमाची संख्या वाढत असताना दुसरीकडे बीडच्या तीन भावंडांनी आपल्या आईचं मंदिर उभारले आहे. या मंदिरात त्यांनी आईची मूर्ती देखील स्थापन केली आहे. ही मूर्ती त्यांनी खास पुण्यावरून मागवली आहे. शेतकरी कुटुंबातील या तिघा भावांनी आपल्या आईला देवतेचा दर्जा दिला आहे.  आईप्रती त्यांनी  दाखवलेल्या  प्रेमाची जिल्हा सह महाराष्ट्रभरात चर्चा होत आहे (Maharashtra News).  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईच्या स्मृती जपण्यासाठी मुलांनी उभारले आईचे मंदिर 


बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील खाडे  बंधूनी आपल्या आईचे मंदिर बांधले आहे.  नऊ लाख रुपये खर्चून सावरगाव घाट या ठिकाणी आपल्या दिवंगत आई राधाबाई शंकर खाडे यांचे अतिशय भव्य व देखणे असे मंदिर यांनी उभारले आहे.


राधाबाई शंकर खाडे या राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील रहिवासी.  शेतकरी कुटुंबातील राधाबाई खाडे यांचे मागील वर्षी 18 मे रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने खाडे कुठून यांना मोठा धक्का बसला या कुटुंबात त्यांचे पती शंकर खाडे यांच्यासह त्यांचे तीन मुलं विष्णू, राजेंद्र आणि छगन तसेच विवाहित मुलगी आशा असे त्यांचे कुटुंब आहे. 


राधाबाई यांच्या निधनानंतर एक महिन्यातच या तिन्ही भावंडांनी आपल्या दिवंगत आईची स्मृती कायम असाव्यात असे काहीतरी करू असा विचार करून आपल्या जागेमध्ये आईचे भव्य मंदिर बांधण्याचा निश्चय केला.  केवळ निश्चय करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी तातडीने मंदिराचे काम सुरू केले. 10 बाय 13 च्या जागेत या मंदिराचे उभारणीचे काम सुरू झाले. सहा महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी शिल्पाकृती असलेली अतिशय आकर्षक असे सजीव वाटावी अशा प्रकारची मूर्ती बसवण्याचे ठरवले. मूर्तिकाराचा शोध सुरू केल्यानंतर पुण्यातील कातोरे या मूर्ती बनवणाऱ्या शिल्पकाराची माहिती त्यांना मिळाली. तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती सांगितल्यानंतर ते देखील ही मूर्ती बनवण्यास तयार झाले. 


तब्बल चार ते पाच महिने या मूर्तीवर काम करून त्यांनी अतिशय आकर्षक व भक्ताक्षणी सजीव वाटावी अशा प्रकारची राधाबाई खाडे यांची सुंदर मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती पावणे तीन फूट उंच आहे. या मंदिरासाठी आणि मूर्तीसाठी सर्व मिळून तब्बल नऊ लाख रुपये खाडे बंधू यांनी खर्च केले आहेत.