व्हॉटसअॅप ग्रुपवर कुत्रा म्हटल्याने औरंगाबादमध्ये एकाची हत्या
दम असेल तर नाव घेऊन मेसेज टाक असे धमकावले होते.
औरंगाबाद: व्हॉटसअॅप ग्रूपवर कुत्रा म्हटल्याने औरंगाबादमध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हर्सूल भागातील फातेमानगर चौकात रविवारी रात्री ही घटना घडली.
मोईन मेहमूद पठाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मोईनचा भाचा इरफान शेख रहीम हल्ल्यात गंभीर जखमी झाला.
चार दिवसांपूर्वी मोईन पठाणने एका व्हॉटसअॅप ग्रुपवर टाकलेल्या मेसेजमध्ये काही व्यक्तींना कुत्रे म्हणून संबोधले होते. हा मेसेज वाचून मारेकऱ्यांपैकी काही जणांनी दम असेल तर नाव घेऊन मेसेज टाक असे धमकावले होते. योग्यवेळी कुत्र्यांची नावेही जाहीर करेन आणि त्यांच्यासमोरही येईन, असे उत्तर मोईनने दिले होते.
यानंतर तब्बल चार दिवसांपासून मारेकरी आणि मोईन यांच्यात धुसफूस सुरू होती. दरम्यान, रविवारी संशयित मारेकऱ्यांनी मोईनला गावातील फातेमानगर चौकात बोलावले. आणि तिथेच बाचाबाची झाली आणि मारेकऱ्यांना मोईनवर तलवार, चाकू आणि रॉडच्या सहाय्याने हल्ला केला. यामध्ये मोईनचा मृत्यू झाला.