मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी मारणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू
मराठा संघटना बिलकूल मागे हटायला तयार नाहीत.
औरंगाबाद: आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी गंगापूर येथील कायगाव येथे काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. आंदोलन सुरु असताना मोर्चेकऱ्यांपैकी काकासाहेब शिंदे या तरूणाने गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. त्याला नदीतून बाहेर काढून लगेचच उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे.
गंगापूर तालुक्यातील कानडगावात राहणारा काकासाहेब शिंदे हा तरुण मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी औरंगाबादला आला होता.
तत्पूर्वी मराठा संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी पंढरपुरात झालेल्या विठ्ठलाच्या महापूजेला उपस्थित राहता आले नव्हते. त्यानंतर मराठा संघटनांचे काही प्रमाणात समाधान होईल, असा अंदाज होता. परंतु मराठा संघटना आक्रमक पवित्रा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे प्रशासनाला सोमवारी औरंगाबादेत अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले.
मराठा संघटनांकडून आज (सोमवारी) गंगापूर तालुक्यात मोर्चा काढण्यात आला होता. मराठा क्रांती मोर्चामुळे औरंगाबाद-नगर महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. आंदोलकांना हा मार्ग पूर्णपणे अडवून धरला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.