`या` ७ मागण्या मान्य केल्या तरच महाराष्ट्र बंद आंदोलन मागे घेणार
औरंगाबादमधून या बंदची सुरुवात होईल.
औरंगाबाद: राज्यातील मराठा संघटनांकडून मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये सोमवारी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चातील काकासाहेब शिंदे या तरूणाने आंदोलनादरम्यान गोदावरीच्या पात्रात उडी मारली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांकडून हा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादमधून या बंदची सुरुवात होईल. सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत सुरु राहील, मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पाटील यांनी सांगितले.
मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
1. काकासाहेब शिंदे याच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.
२. काकासाहेब शिंदे याला हुतात्मा म्हणून घोषित करण्यात यावे.
३. औरंगाबदमधील घटनेसाठी जबाबदार असलेले प्रशासकीय व पोलीस अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
४. काकासाहेब शिंदे याच्या कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी.
५. काकासाहेब शिंदेच्या भावाला सरकारी नोकरी द्यावी.
६. मराठा आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य करावी.
७. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्यातील मेगा भरतीला स्थगिती द्यावी.