मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेला, काकासाहेब शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता
काकासाहेब युवासेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख माने यांच्या गाडीचा चालक म्हणून काम करत होता.
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या गंगाखेड तालुक्यातील आंदोलनादरम्यान गोदावरी नदीत उडी मारून, मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेला काकासाहेब शिंदे हा तरुण शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता असलेला काकासाहेब युवासेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख माने यांच्या गाडीवर चालक होता. ही माहिती पुढे आल्यानंतर आता सरकारवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी काकासाहेब शिंदे याचा मृतदेह स्वीकारण्यास त्याच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासह त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे, आरक्षणाची तात्काळ घोषणा, शिंदेच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत.
गंगापूर तालुक्यातल्या कायगाव टोक्यावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात उडी मारली. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांच्या गाडीची तोडफोड केली. तसेच आंदोलकांनी पुणे-औरंगाबाद महामार्गावरची वाहतूक अडवून धरली. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.