शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : जसा जसा पावसाळा संपत आहे तसे मराठवाड्यातील दुष्काळाचे संकट गडद होऊ लागले आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी संभाजी सेनेच्यावतीने रेणापूरला भव्य हलगट मोर्चा काढण्यात आला. यावेळी 'हालगट' अर्थात हल्याच्या पाठीवर मी सरकार आणि मी विरोधी पक्ष असे बॅनर लावून हा मोर्चा काढण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेणापूरच्या रेणुकादेवी मंदिर ते रेणापूर तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, सरसकट कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, जनावरांच्या चाऱ्यासाठी एका जनावरानुसार कमीतकमी २००० रुपये अनुदान द्यावे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास द्यावा यासह इतरही अनेक मागण्या या  आंदोलकांनी केल्या. 


यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजीही करण्यात आली. संभाजी सेनेचे अध्यक्ष सुधाकर माने यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांसह शेतकरीही सामील झाले होते. 



या आंदोलनात शेतकरी आणि संभाजी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी संभाजी सेनेचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी दिलाय.