सोलापूर: दुधाचे दर वाढवण्याच्या मागणीला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असतानाच सोमवारी सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे आंदोलनाला गालबोट लागण्याचा प्रकार घडला. मंगळवेढा तालुक्यातील सागर सुरेश लेंडवे यांनी दुधाने अंघोळ करतानाचा व्हिडीओ शुट करून सोशल मीडियावर टाकला. त्याने आपल्या गुरांनाही दुधाने अंघोळ घातली. यासाठी जवळपास ३५ लीटर दूध वाया गेले. हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. अशा घटनांमुळे आंदोलन बदनाम होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तत्पूर्वी जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनीदेखील आंदोलन चुकीच्या दिशेने जाण्याबद्दल भीती व्यक्त केली. महाराष्ट्रात दुधाचे दर प्रति लीटर १४ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, हे वास्तव आहे. त्यामुळे शेट्टींनी घेतलेला पवित्रा गैर नाही. परंतु, हा मुद्दा मांडत असताना त्याची पद्धत चुकायला नको, असे कोरे यांनी सांगितले.