Beed News Today: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची संलग्न परळी येथील नागनाथ आप्पा हलगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विद्यार्थी थेट मोबाईल समोर ठेवून परीक्षेत कॉपी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थेट मोबाईल समोर ठेवून कॉपी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेमध्ये विद्यार्थी मोबाईलचा वापर करत असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते त्याचबरोबर कॉपी करताना देखील विद्यार्थी दिसत आहेत. अनेक जण मायक्रो झेरॉक्सचे बंडलच परीक्षेत घेऊन बसल्याचं पाहायला मिळतंय. 


परीक्षा केंद्रामध्ये या कॉपीचे व्हिडिओ चित्रण करीत परीक्षार्थींचे मोबाईल जप्त करणाऱ्या सह केंद्रप्रमुखास विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकले त्यामुळे या सर्व प्रकरणानंतर अभियांत्रिकी परीक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.


विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षांना 12 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी परळी येथील नागनाथ आप्पा हलगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक दशरथ रोडे यांनी 13 डिसेंबर रोजी सह केंद्र प्रमुख म्हणून परीक्षा विभागाने नियुक्ती केली. 14 डिसेंबर रोजी सकाळी रोडे केंद्रावरती गेले असता परीक्षा हॉलमध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी पर्यवेक्षकांसमोर विद्यार्थी थेट मोबाईल समोर ठेवून उत्तर पत्रिका लिहीत होते. तसेच मायक्रो झेरॉक्सच्या कॉपीचे बंडल देखील हॉलमध्ये पाहायला मिळाले. 


परीक्षा केंद्रातील हा सर्व प्रकार पाहून याप्रकरणी त्यांनी व्हिडिओ काढले त्यानंतर मोबाईल जप्त केले हे सर्व मोबाईल एकत्रित करून त्याचा व्हिडिओ देखील केला. मात्र, या सर्व प्रकरणानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे.