नितीन गडकरींना स्टेजवर भोवळ; विशेष विमानाने नागपूरला परतणार
गडकरी यांची प्रकृती स्थिर
अहमदनगर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी अहमदनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान भोवळ आली. ते आज राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी आले होते. यावेळी व्यासपीठावर असतानाच गडकरी यांना अचानक चक्कर आली.नितीन गडकरी यांचे भाषण सुरु झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरु असताना हा प्रकार घडला. यावेळी सुदैवाने राज्यपाल सी. विद्यासागर राव गडकरी यांच्याशेजारी उभे होते. नितीन गडकरींना चक्कर येत असल्याचे पाहून राज्यपालांनी त्यांना सावरले. यानंतर गडकरी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गडकरी यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाली. यानंतर ते रुग्णालयातून चालत बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसले. दरम्यान, आजचा दौरा आटोपल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात येईल.