औरंगाबाद: पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भ, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार  हजेरी लावली आहे. सागरी किनारा असलेल्या परिसरात  चांगला पाऊस झालाय.  त्या तुलनेत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती. मात्र, आता त्यांची चिंता वाढू लागलीय. अरबी समुद्राच्या किनाऱ्याबाहेर निर्माण झालेला ‘ऑफशोअर ट्रफ’ यासाठी कारणीभूत आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली नाही. एरवी जून महिन्यातच इथला शेतकरी खरीपाची पेरणी करतो. मात्र, यंदा परिस्थिती बिकट झाली आहे. अद्यापही जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यामुळं खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

जून महिन्यात झालेल्या पावसाच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली होती. मात्र, आता उन्हामुळे हळूहळू जमिनीतला ओलावा कमी होऊ लागली आहे. अशातचं  पावसानं ताण दिल्यामुळं पीकं करपू लागली आहेत. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार  गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या मान्सूनची वाटचाल  संथ गतीने होत आहे.