औरंगाबाद: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांचा भारिप आणि ओवेसी बंधुंच्या एमआयएम पक्षाने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २ ऑक्टोबरला असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युतीची पहिली बैठक होईल. यानंतर औरंगाबादमध्ये दोन्ही पक्षांची संयुक्त जाहीर सभाही आयोजित करण्यात आली आहे. 


आगामी निवडणूक लढवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्यात पत्राद्वारे चर्चा सुरु होती. अखेर दीर्घ चर्चेअंती दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची औपचारिक घोषणा २ ऑक्टोबरला होणार आहे. ही आघाडी सगळ्यांसाठी खुली असून काँग्रेसचा प्रस्ताव आला तरी पक्षप्रमुख याबाबत निर्णय घेतील, असे दोन्ही पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.