पाहा कशासाठी पिपाणी वाजवतायतं सुप्रिया सुळे
राजू शेट्टींनी दुधासाठी केलेली पाच रुपये दरवाढीची मागणी योग्य आहे.
बुलढाणा: राज्याच्या विविध भागांमध्ये सोमवारपासून दूध आंदोलनाने जोर पकडला. सोलापूर, जालना, बुलडाणा, अमरावती आणि पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. या आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर बुलढाण्यात थेट रस्त्यावर उतरून भर पावसात पिपाणी आंदोलनही केले.
यावेळी सुप्रिया सुळेंना राजू शेट्टींच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. राजू शेट्टींनी दुधासाठी केलेली पाच रुपये दरवाढीची मागणी योग्य असल्याचेही सुळे यांनी म्हटले. विरोधी पक्षांनी या आंदोलनाला दिलेल्या उत्स्फुर्त पाठिंब्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे.
तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आक्रमक पद्धतीने आंदोलन केले. सोलापुरातल्या माळशिरस-विझोरी, तसंच सांगोला इथल्या महूदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूधाचा टेंपो फोडला. तसेच सोलापूर-पूणे महामार्गावरच्या वरडवेजवळ मुंबईला जाणारा दुधाचा टँकर अडवून त्यामधील दूध रस्त्यावर सोडून दिले. जालन्यातही दूध रस्त्यावर ओतून सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध करण्यात आला. दूध आंदोलनाचा नाशिकमध्ये काही अंशी परिणाम दिसून आला.