मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आणि निर्माता आमीर खान वर्ष-दोन वर्षातून एकदा चित्रपट करतो. परंतु, त्याचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर नेहमीच धमाल करतात आणि रेकॉर्ड ब्रेक होतात. असे ब्लॉकबास्टर चित्रपट बनवण्यासाठी मेहनत गरजेची आहेच. पण या व्यतिरिक्त आमीर एका विशेष गोष्टीकडे लक्ष देतो. निर्माता म्हणून काम करताना आमीर आणि त्याची टीम नेहमी आपल्या मनाचा आवाज ऐकतात आणि त्याप्रमाणे काम करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


'लगान' आणि 'तारे जमीन पर' सारख्या चित्रपटांची निर्मिती करणारे आमीर खान प्रॉडक्शन ही कंपनी भारतातील यशस्वी फिल्म निर्माण कंपनींपैकी एक आहे. मुलाखती दरमान्य आमीर खान म्हणाला की, ‘’आम्ही फक्त आमच्या मनाचे ऐकतो. प्रॉडक्शन हाऊस म्हणून काम करताना जी कथा आणि विषय आम्हाला आवडतो, भावतो, असं वाटतं की यावर चित्रपट करायला हवा त्यावर आम्ही नक्कीच काम करतो. अशावेळी मग व्यावसायिक फायदा लक्षात घेत नाही.’’


 


त्याचबरोबर आमीर म्हणाला की, ‘’अभिनेता म्हणून कारकीर्द सुरु करताना देखील मी हाच विचार करून सुरुवात केली होती. ज्या विषयावर, कथेवर विश्वास होता, त्या चित्रपटातच काम केले. मी माझ्या प्रॉडक्शन हाऊस मधून १७ वर्षात ८ चित्रपटांची निर्मिती केली. साधारणपणे २ वर्षातून एक चित्रपट आम्ही करत असू. म्हणून ज्यावर विश्वास आहे असेच चित्रपट करतो आणि मनातून आलेला आवाज ऐकतो.’’


 


आता आमीर खान प्रॉडक्शनचा 'सीक्रेट सुपरस्टार' हा नवाकोरा चित्रपट येत आहे. 'दंगल' नंतर जायरा वसीम पुन्हा एकदा आमीरसोबत काम करत आहे. यंदाच्या दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.