डोंबिवली : महिलेच्या सतर्कतेमुळे दिवसाढवळया घरफोडी करणारा चोरटा जेरबंद झाला. अंजली घाडीगांवकर (वय ३९) असे या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सतर्कतेमुळे त्यांच्या मुलाचे प्राण देखील वाचले. घरात घुसलेल्या चोरटयाकडून अंजली यांचा मुलगा प्रणव (वय १४) याला जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला. मात्र त्याचवेळी त्या कामावरून परतल्या आणि आरडाओरड केला. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांनी पळणाऱ्या चोरट्याला पकडून बेदम चोप दिला आणि नंतर रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजली आणि त्यांचे पती आशिष देखील कामानिमित्त मुंबईला जातात. डोंबिवली राहणारे हे जोडपे नेहमीप्रमाणे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर आठवीत शिकणा-या प्रणवची बुधवारपासून सहामाही परिक्षा असल्याने मंगळवारी त्याला सुट्टी होती. त्यामुळे तो आणि त्याची आजी सरस्वती असे दोघेच घरात होते. परंतु, आजी  डॉक्टरकडे गेल्याने प्रणव दुपारच्या सुमारास घरी एकटाच होता. मात्र आईस्क्रीम खाण्याच्या निमित्ताने तो देखील घराबाहेर पडला. त्याच दरम्यान चोरटयाने घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील ऐवज चोरण्याचा चोरटयाचा खटाटोप चालू असतानाच प्रणव हा घरी परतला असता हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. 


प्रणवने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता चोरटयाने त्याचा गळा आवळीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, परिक्षा असल्याने प्रणवचा अभ्यास घेण्यासाठी कामावरून लवकर घरी परतणा-या अंजली त्याचवेळेस सुदैवाने घरी आल्या आणि समोरचा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी हा सर्व प्रकार पाहताच जोरदार आरडाओरड करायला सुरूवात केली. या आवाजाने मदतीसाठी घराकडे धाव घेतलेल्या रहिवाशांनी पळणा-या चोराला पकडले आणि बेदम चोप देत रामनगर पोलिसांच्या हवाली केले. 


रेहान फुरखान खान (वय ३६) असे या चोरटयाचे नाव असून तो उत्तरप्रदेश मधील मेरठ, बाजारघर येथील राहणारा आहे. पोलिसांना घटनास्थळी लोखंडी कटावणी आठळून आली असून चोरटा घरातील  सोन्याचे दागिने आणि काही रोकड असा ३८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून पळणार होता. मात्र अंजली यांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्रयत्न फसला. चोरटा रेहान याला बुधवारी कल्याण जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.