देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : राज्यभरात कोरोनाचा धोका वाढतोच आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपापल्यापरिने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याचं आवाहन केलं आहे. या निधीमध्ये सर्वसामान्य जनताही जमेल तितकी मदत करुन खारीचा वाटा उचलत आहेत. अशातच धारावीत राहणाऱ्या एका १० वर्षीय मुलीने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ५ हजारांची मदत केली आहे. चिमुकलीने उचललेलं हे पाऊल अतिशय कौतुकास्पद असून सर्वांनाच प्रेरणा देणारंही आहे. 
 
मुंबईतील धारावी भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धारावीतील लेबर कॅम्प येथे राहणाऱ्या प्रज्ञा मोटे या १० वर्षीय शाळकरी मुलीने तिचा वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री सहायता निधीला पाच हजार रुपयांची मदत केली आहे. १५ एप्रिलला प्रज्ञाचा वाढदिवस असतो. मात्र वाढदिवस साजरा न करता, वाढदिवसासाठी खर्च होणारी रक्कम तिने तसंच संपूर्ण मोटे कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाला हरविण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही प्रज्ञाने सर्व नागरिकांना केलं आहे. राज्यावरचं कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. लोकांना वारंवार अत्यावश्यक गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं, घरातच राहण्याचं आवाहन करण्यात येतंय. 


धारावीत कोरोना बळींची संख्या ७ झाली असून कोरोनाचे ५५ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १५०० वर पोहचली आहे, कोरोनामुळे एकट्या मुंबईत तब्बल १०० हून अधिकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचा धोका वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्याचं महापालिका प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.