१०० वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात
कोरोनाची लागण झाल्यामुळे २४ फेब्रुवारीला या आजोबांना हुबेईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वुहान: सध्या जगभरात कोरोना व्हायरसची प्रचंड दहशत पसरली आहे. चीन, इटली आणि इराण या देशांमध्ये एकापाठोपाठ एक लोक या आजाराला बळी पडत आहेत. मात्र, चीनच्या वुहानमध्ये एका १०० वर्षाच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनासारख्या घातक आजारातून बरे होणारे ते सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत. कोरोनाशी यशस्वीपणे झुंज देणाऱ्या या आजोबांना शनिवारी रुग्णालयातून सोडण्यात आले, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.
कोरोनाची लागण झाल्यामुळे २४ फेब्रुवारीला या आजोबांना हुबेईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या आजोबांना श्वसनाच्या विकारासह अल्झायमर, हायपरटेन्शन आणि हृदयासंबधित काही व्याधी होत्या. त्यांच्यावर तब्बल १३ दिवसांपासून उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांना साथीच्या आजारांचा मुकाबला करणारी औषधे देण्यात आली होती. या उपचारांना शरीराने योग्य साथ दिल्यामुळे हे आजोबा कोरोनासारख्या गंभीर आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
'राहुल गांधी नुकतेच इटलीहून परतलेत, त्यांची कोरोना टेस्ट झालेय का?'
चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोनाने जगभर थैमाने घातले आहे. जगातील ९० हून अधिक देशात सुमारे १ लाख ९ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३०९७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार चीन आणि इटलीमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झालाय. त्याखालोखाल इराण आणि दक्षिण कोरियातही अनेकजण कोरोनामुळे दगावले आहेत.