मुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. यंदा 10वी, 12वीच्या परीक्षाही होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यात आले. पण आता या विद्यार्थ्यांची चिंता वाढलीय. त्यांना नोकरी मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमुळं विद्यार्थी-पालकांची झोप उडाली आहे. 


या मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- 10वी, 12वीच्या वर्गात प्रमोट झालेल्यांनी लक्ष द्यावं 
- कोरोना काळातील 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांच्या निकालाला सरकारी नोकरीमध्ये मान्यता नसेल 
- यावर्षी परीक्षा न देता विद्यार्थ्यांना मार्कशीट देण्यात आल्या आहेत 
- त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये या विद्यार्थ्यांच्या मार्कशीट ग्राह्य धरण्यात येणार नाहीत 


हा मेसेज पाहिल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्यानं झी 24 तासनं या व्हायरल मेसेजची पडताळणी केली. सरकारनं खरंच असा निर्णय घेतलाय का? याविषयीची माहिती घेतली. संबंधित विभागाच्या साईट्सवर जीआरविषयीची तपासणीही केली. 


काय आहे सत्य?


10वी, 12वी परीक्षेत प्रमोट झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोकरीबाबत असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत ग्राह्य धरणार नाही या दाव्याला पुष्टी देणारा एकही पुरावा आढळला नाही. 


विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठीच हा मेसेज व्हायरल केला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांच्या नोकरीबाबत केंद्र किंवा राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा व्हायरल मेसेज असत्य ठरलाय. अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका.