Crime News: मुंबईच्या परळमधील टाटा कॅन्सर रुग्णालय (Tata Cancer Hospital) हे संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. देशभरातून लोक कॅन्सरवरील उपचारांसाठी टाटा रुग्णालयात येत असतात. येथे येणाऱ्या रुग्णांमध्ये गरिबांची संख्या जास्त असते. मात्र याच रुग्णांची रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडूनच फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दलाली मिळवण्यासाठी गरीब रुग्णांना विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी परळमधील (Parel) खासगी प्रयोगशाळेत पाठवल्याबद्दल पोलिसांनी 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी 23 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, यामध्ये प्रयोगशाळेचा मॅनेजर आणि मालक यांचाही समावेश आहे. 11 जणांना पोलिसांनी अटक केली असून, इतर आरोपी फरार आहेत. टाटा मेमोरियल रुग्णालयाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अनिल भोसले यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या सुरक्षा विभागाला काही कर्मचारी गैरप्रकार करत असल्याची माहिती मिळाली होती. "आरोपी कर्मचारी डॉक्टरांना भेटण्यासाठी येणाऱ्या रुग्णांवर नजर ठेवत होते. जेव्हा डॉक्टर त्यांना एमआरआय, सीटी-स्कॅन, एक्स-रे, पीईटी स्कॅन आणि 2डी इको सारख्या चाचण्या करण्यास सांगत तेव्हा आरोपी त्यांना रुग्णालयात यासाठी फार वेळ लागले किंवा मशीन बंद आहे सांगत दिशाभूल करायचे. या चाचण्या रुग्णालयातच अगदी कमी खर्चात करता येतात. यानंतर ते रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना खासगी प्रयोगशाळेत चाचण्या करण्यासाठी तयार करायचे. गांधी रुग्णालयाजवळ असणाऱ्या इंफिनिटी सेंटरमध्ये ते त्यांना पाठवत असत," अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


आरोपी कर्मचारी व्हॉट्सअपवरुन रुग्णाची माहिती प्रयोगशाळेच्या मॅनेजरला पाठवत असतं. यानंतर त्यांना आठवड्याच्या शेवटी कमिशन मिळत असे. 


रुग्णालयाने कर्मचारी आणि लॅबचं हे रॅकेट उघड करण्याचा निश्चय केला. त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने या सर्व संशयित कर्मचाऱ्यांवर नजर ठेवली. 15 जुलैला दोन कर्मचारी रुग्णालयातून गायब झाले आणि इंफिनिटी सेंटरलवळ पोहोचले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. जेव्हा लॅबचा मॅनेजर संजय सोनावणे पैशांची भरलेली बॅग घेऊन पोहोचला तेव्हा त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं अशी सूत्रांची माहिती आहे. 


रुग्णालयात साक्षीदारांच्या उपस्थितीत बॅग उघडली असता पोलिसांना एकूण 24 लिफाफे सापडले ज्यामध्ये 3.79 लाख रोख रुपये होते. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नावांची पाच पानांची यादी होती, ज्यांना हे लिफाफे द्यायचे होते. पोलिसांनी याप्रकरणी 11 जणांना अटक केली असून, कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. 


पोलिसांना आरोपी कर्मचारी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून है गैरप्रकार करत होते असा संशय आहे. तसंच इतर प्रयोगशाळाही या गुन्ह्यात सहभागी असाव्यात असा अंदाज आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले असून, व्हॉट्सअपवरुन प्रयोगशाळेसह केलेले चॅटही मिळवले आहेत.