चिंता वाढली, राज्यात कोरोना बाधितांची संख्या १२२ वर
राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.
मुंबई : राज्यात कोरोना फैलाव थांबायचे नाव घेत नाही. राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ११६ वरुन १२२ झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. तर मुंबई येथे चार जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईत नव्याने पाच आणि ठाणे येथे एक रुग्ण आढळून आला आहे.
मुंबईत एकूण कोरोना रुग्ण ४५ कोरोनाबाधित सापडले आहेत. मुंबईत रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यात नव्याने पाच जणांना समावेश झाला आहे. तर उपनगरातील ठाण्यात एक वाढला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १२२ वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्र राज्यात असल्याची माहिती आहे.
१५ जण उपचारानंतर कोरोनामुक्त
दरम्यान, राज्यात काल एकूण १५ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी ८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना बाधित झाल्यामुळे मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेले १२ रुग्ण दुसऱ्या चाचणीत बरे झाले असल्याची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी दक्षा शाह यांनी दिली. गेले काही दिवस हे रुग्ण उपचार घेत होते. त्यांचे रक्ताचे नवीन नमुने चाचणीसाठी पाठवले असता ही चाचणी निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
पुण्यातल्या नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेले दोघंही कोरोनामुक्त झाले आहेत. १४ दिवसांनी केलेल्या त्यांच्या वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह असून त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल, ती निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी पाठवून त्यांचं १४ दिवस घरी विलगीकरण करण्यात येणार आहे.