मुंबई: अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील वादामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या Axis बँकेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये Axis बँकेतील अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरीला रामराम ठोकल्याचे समजते. ही संख्या थोडीथोडकी नसून तब्बल १५ हजारांच्या घरात आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये वरिष्ठ पातळीवरील अधिकारी आणि ग्राहकांशी थेट संबंध येणाऱ्या सेवांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महाराष्ट्राने काय करावं हे Axis बँकेच्या कर्मचाऱ्याने सांगू नये'


सूत्रांच्या माहितीनुसार, Axis बँकेतील कर्मचारी वर्ग नव्या व्यवस्थापनावर नाराज आहे. बँकेने कामाच्या पद्धतीत आमुलाग्र बदल केला आहे. त्यासाठी ऑटोमेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यासारखे नवीन तंत्रज्ञान अंमलात आणले जात आहे. बँकेतील प्रस्थापित अधिकारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांना हा बदल पचनी पडलेला नाही. त्यामुळे कर्मचारी इतक्या मोठ्या प्रमाणात राजीनामे देत असल्याचे समजते. 


अमृता फडणवीस-शिवसेना वादात AXIS बँकेला फटका बसण्याची शक्यता


मात्र, ही तूट भरून काढण्यासाठी Axis बँकेनेही नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरु केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात आतापर्यंत २८००० कर्मचारी भरती करण्यात आले आहेत. तर आगामी काही दिवसांमध्ये आणखी ४ हजार कर्मचारी भरती करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. तसेच पुढील दोन वर्षांमध्ये एकूण ३० हजार कर्मचारी सेवेत सामावून घेण्याचा बँकेचा मानस आहे. सध्याच्या घडीला Axis बँकेत ७२ हजार मनुष्यबळ आहे. त्यापैकी गेल्या आर्थिक वर्षात ११ हजार ५०० कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता.


तत्पूर्वी अमृता फडणवीस आणि शिवसेनेतील वादामुळेही Axis बँकेला मोठा फटका बसला होता. अमृता फडणवीस Axis बँकेच्या उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर राज्य सरकारने Axis बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यानंतर शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या अनेक महापालिकांनीही Axis बँकेतील ठेवी इतरत्र वळवण्याचे संकेत दिले होते.