मुंबई : अमृता फडणवीस आणि शिवसेनेमधला वाद मिटण्याची चिन्हं नाहीत. अमृता फडणवीसांनी ट्विटरवरून शिवसेनेच्या धोरणावर किंवा नेत्यावर टीका केली की त्याला तितकंच तिखट प्रत्युत्तर दिलं जातं आहे. मात्र या वादामध्ये अमृता उपाध्यक्ष असलेल्या अॅक्सिस बँकेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अॅक्सिसमध्ये महाराष्ट्र पोलिसांची जवळजवळ २ लाख सॅलरी अकाऊंट आहेत. मात्र या ट्विटवॉरनंतर राज्य सरकारनं ही खाती राष्ट्रीय बँकेमध्ये वळवण्याचे संकेत दिले आहेत. त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेनंही असाच निर्णय घेतला आहे.
यावर कडी म्हणून की काय, देशातली सर्वात जास्त बजेट असलेल्या मुंबई महापालिकेनंही अॅक्सिस बँकेच्या आडून अमृतावहिनींना दणका देण्याची तयारी केली आहे. एका अर्थी शिवसेना-अमृता वादामध्ये अॅक्सिस बँकेचं सँडविच होत असल्याचं दिसतं आहे. पोलिसांचे पगार अन्यत्र जाण्याच्या संभाव्य निर्णयावर बँकेनं स्पष्टीकरण दिलं आहे.
'पोलीस आणि लष्कराच्या जवानांना सेवा देणं हा अॅक्सिस बँकेसाठी अभिमानाचा विषय आहे. गेल्या दोन दशकांपासून आम्ही ही सेवा देतोय आणि यापुढेही देत राहू. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांशी आमचे १५ वर्षांपासून व्यावसायिक संबंध आहेत. त्याबरोबरच लष्कर, नौदल, कोस्ट गार्ड, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, सीआरएसएफ आदी दलांच्या पगारांची खातीही आम्ही हाताळतो आहे. आमच्या सेवांवर पोलीस, सैन्यदले आणि अन्य सरकारी विभाग समाधानी असतील, याची खात्री आहे.' असं बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दहिया यांनी म्हटलं आहे.
आम्ही सूडाचं राजकारण करणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मात्र अमृता फडणवीसांची टीका शिवसेनेनं फारशी खिलाडू वृत्तीनं घेतल्याचं सध्या तरी दिसत नाही आहे. सेवेमध्ये काही समस्या असतील, तर बँक बदलणं योग्य आहे. मात्र बँकेच्या एखाद्या हायप्रोफाईल कर्मचाऱ्याशी वाद आहे, म्हणून खाती बंद करणं हा बदला नाही तर काय आहे?.