मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतो आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७६१वर पोहचली आहे. त्यापैकी ७० टक्के रुग्ण धोक्याबाहेर आहेत. तर ५ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १८७ रूग्ण वाढले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. 


महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईतच १०००हून अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरमध्ये ९१ टक्के रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबईत ६१ टक्के कोरोनाबाधित आहेत. तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात ९ टक्के रुग्ण आहेत. शहरी भागात अधिक रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.


कोरोनासाठी ३ प्रकारची रुग्णालयं असणार आहेत. यात कोरोनाच्या रुग्णांचं वर्गीकरण करुन, आजाराच्या प्रमाणानुसार उपचार करण्यात येणार आहेत. लाखोंच्या संख्येने संशयितांचं ट्रेसिंग करण्यात येत आहे.


राज्यात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसंच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी, कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. 


मुंबईत एकूण रूग्ण संख्या ११८२ वर गेली आहे. मुंबईत आतापर्यंत ७५वर मृत्यू झाले आहेत. 


महाराष्ट्रात आतापर्यंत ३० हजार कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर मुंबईत १९ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशाच्या उर्वरित भागात १,१०,०७२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. मात्र राज्यातील परिस्थिती, सतत वाढणारे कोरोना रुग्ण पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन पुढील २ आठवडे म्हणजे ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. कोणीही गर्दी न करता शिस्त पाळा, तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेऊन कोरोनाविरोधातील युद्द जिंकायचंच असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.