मुंबई : जवळपास संपूर्ण देश कोरोनाव्हायरसच्या जाळ्यात आला आहे. देशातील कोरोना बाधितांच्या बळींची संख्या आता वाढून ४९२ झाली आहे. यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. कोविड -१९ पासून आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविड१९ मध्ये जगभरात ३ लाख ८० हजारांहून अधिक रुग्ण आहेत आणि  १६,४९७ लोकांचा मृत्यू झाला आहे.  तर महाराष्ट्र राज्यात १८ नवीन कोरोना बाधित रुग्ण असून राज्यातील एकूण रुग्ण संख्या १०७ पोहोचली आहे. काल रात्रीपासून कोरोनाच्या १८ नविन रुग्णांची नोंद झाली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६, सांगली मधील  इस्लामपूरचे ४, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण - डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ८ रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


दरम्यान, काल संध्याकाळी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोना बाधित असलेल्या एका ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. दुबईमध्येच स्थायिक असलेले हे गृहस्थ  १५ मार्च २०२० रोजी अहमदाबाद येथे पाठीच्या दुखण्यावरील उपचारासाठी आले होते. त्यानंतर ते मुंबईत आले. २० मार्च २०२० पासून त्यांना ताप येणे सुरु झाले. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे उपचार घेत असतानाच  त्यांना खोकला आणि श्वासास त्रास व्हायला सुरु झाले. २३ मार्च रोजी ते कस्तुरबा रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झाले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. कोरोनामुळे राज्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे.  


राज्यात आज परदेशातून आलेले ३८७ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात सध्या ११ हजार ९७ लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन)  आहेत.  १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत २५३१ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २१४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १०७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 


केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अतिजोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून सध्या ८८० प्रवासी क्वारंटाईन संस्थामध्ये आहेत. दरम्यान,  दोन दिवसात पुणे - मुंबई मधील लोक आपापल्या गावी जाताना दिसत आहेत. काही ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या लोकांबद्दल भितीचे वातावरण आहे, या लोकांची करोना टेस्ट करुन घ्यावी, अशी मागणी काही तुरळक ठिकाणी होताना दिसते आहे. ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.