मुंबई : कोविड-19 विषाणूच्या (Coronavirus in Mumbai) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून 18 वर्षांवरील लोकांचे आजपासून शहरातील पाच कोविड केंद्रावर लसीकरण ((18+ vaccinations) करण्यात येणार आहे, अशी माहिती  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने देण्यात आली. केवळ 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण आज 1 मे रोजी प्रारंभ होत आहे महापालिकेच्या पाच लसीकरण केंद्रांवर कोविन ॲपवर नोंदणी केलेल्यांचेच लसीकरण होणार आहे.लशींच्या साठा मोजकाच उपलब्ध झाल्यामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. (18+ vaccinations in Mumbai) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कोविड प्रतिबंधात्मक लशींच्या मोजकाच मात्रांचा नुकताच प्राप्त झाला आहे.  18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु करण्यात येत आहे. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच सध्यातरी लशीची केवळ पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.


कोविड केंद्रावर गर्दी करु नये


भविष्यात लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करीत असून नागरिकांनी लसीकरण करवून घेण्यासाठी गर्दी करू नये व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे परिपूर्ण पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे या निमित्ताने पुन्हा एकदा करण्यात आले आहे.


या 5 रुग्णालयांमध्ये लसीकरण


मुंबई महानगरपालिकेच्या ज्या 5 रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. त्या पाच रुग्णालयांची नावे जाहीर केली आहेत. यात  बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर, सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर) , डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर), सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर आणि वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर यांचा समावेश आहे.