अजित मांढरे, प्रतिनिधी, मुंबई : १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींचा फैसला उद्या होणार आहे. विशेष टाडा न्यायालय उद्या या पाच जणांना शिक्षा सुनावणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ मुंबईच नाही तर अख्ख्या जगाला दहशतवादाचा नवा चेहरा दाखवणाऱ्या मुंबई साखळी स्फोटांच्या 'ब' खटल्यातील दोषींना गुरूवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. या खटल्यात दोषी ठरलेल्या सात जणांपैकी मुस्तफा डोसाचा तुरूंगात मृत्यू झालाय. तर अब्दुल कयूमला न्यायालयाने दोषमुक्त केलंय. त्यामुळे अबू सालेम, फिरोज खान, ताहेर मर्चंट, रियाझ सिद्दीकी, करिमुल्ला शेख यांना उद्या शिक्षा सुनावली जाईल.


या खटल्यातील सर्वच आरोपी हे ९३ साखळी बॉम्बस्फोटांचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांना फाशीच द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकिलांनी केलीय.


खटल्यातल्या प्रत्येक दोषीविषयी विशेष सरकारी वकिलांनी कठोरातल्या कठोर शिक्षेची मागणी केली.अबू सालेमने केलेलं कृत्य किती भयंकर होतं हे जगाला कळण्यासाठी त्याला फाशीची शिक्षाच योग्य आहे. पण पोर्तुगालशी झालेल्या करारामुळे त्याला फाशी देता येणार नसल्याने कमीत कमी जन्मठेप द्या अशी मागणी सरकारी वकीलांनी केलीय.


फिरोज खान हा मुख्य सूत्रधार असून घातक शस्त्रास्त्र आणणे, त्यांची मुंबईत तस्करी करणे हा मुख्य उद्देश बाळगून तो कटात सहभागी झाला. दाऊद इब्राहीम, टायगर मेमन यांच्या इतकात फिरोजही दोषी आहे. त्यामुळे त्यालाही फाशीची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयात केली.


ताहेर मर्चंट हा पाकिस्तानी दहशतवादी आणि सैन्याच्या संपर्कात होता. तरूणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादाचं ट्रेनिंग देण्यासाठी त्याने पाकिस्तानात पाठवलं. त्यामुळे त्यालाही फाशीचीच शिक्षा योग्य आहे अशी मागणी करण्यात आली.


करीमुल्ला शेख हा दाऊदचा खास हस्तक असून ९३ च्या स्फोटांचं नेतृत्व त्याने केलं. मुख्य सूत्रधारांपैकी तो एक असल्याने करीमुल्लालाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे.


दुबाईत झालेल्या बैठकीनुसार वरच्यांचे आदेश पाळून घातपात घडवण्यात रियाझ सिद्दीकीने प्रमुख भूमिका पार पाडली. रियाझ सिद्दीकीने मारूती व्हॅनमधून आरडीएक्स भरूच इथे अबू सालेमकडे सोपवली. त्यामुळे रियाझलाही फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आलीय.


१२ मार्च १९९३ साखळी बॉम्बस्फोट खटला 'अ' मध्ये १२९ आरोपी होते. त्यापैकी १०० आरोपांना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून ६ महिन्यांपासून ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर मुख्य सूत्रधार म्हणून केवळ याकूब मेमनला फासावर लटकावलं. या खटल्यातील दाऊद इब्राहीम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांच्यासहल एकूण २७ आरोपी फरार आहेत.