नवी मुंबईकरांना नव्या वर्षांत गिफ्ट! वाशी टोल नाका परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार, मानखुर्दपर्यंतचा प्रवास जलद होणार
Vashi Bridge News: वाशी खाडी पुलाची दुसरी बाजू जानेवारीअखेरीस खुली होण्याची शक्यता आहे. डेक उभारणीचे काम सध्या सुरू आहे.
Vashi Bridge News: सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडीवर उभारण्यात येणाऱ्या नवीन उड्डाण पुलांपैकी मानखुर्द बाजुकडील उड्डाणपुलाच्या डेक उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे अंतिम टप्प्यात असून जानेवारी अखेरपर्यंत हा पुल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळं वाशी खाडी पुलावरुन मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या पुलामुळं वाशी खाडी पुलावर होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे.
सायन पनवेल मार्गावर मानखुर्द आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीवर सहा पदरी पूल आहे. मात्र हा पूल अपुरा पडत आहे. त्यामुळं वाशी टोल नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या ठाणे खाडी पुलाच्या दोन्ही बाजूंना संमातर अशा प्रत्येकी तीन मार्गिकांचे आणखी दोन पूल एमएसआरडीसी उभारले जात आहेत. यातील मानखुर्दहून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणारा पूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता वाशीकडून मानखुर्द दिशेला येणाऱ्या वाहनांसाठी इभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही कामे येत्या दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता असून जानेवारी अखेरीस वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. सध्याच्या वाशी खाडीपुलावरून दर दिवशी जवळपास दोन लाखांच्या जवळपास वाहनं प्रवास करतात. ज्यामुळं या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते. पण, वाढीव मार्गिकांमुळं या समस्येवर तोडगा निघणार असल्याची आशा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वाशी खाडी पुलामुळं वाशी खाडी पुलावर होणारी वाहतूक कोंडी टळणार असून वाशी ते मानखुर्द हा प्रवास जलदगतीने होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळं वाहन चालकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या पुलासाठी 559 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर पुलाची लांबी 1837 मीटर इतकी आहे. तर प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन पूल उभारण्यात येत आहे.
ठाणे खाडी पूल प्रकल्प-3
दरम्यान, प्रशासनाने ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पाचे कामदेखील हाती घेतले आहे. ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे खाडी पूल -3च्या रुपाने आणखी एक वाहतुकीचा पर्याय नागरिकांना खुला झाला आहे.