मुंबईत २४ तासात तब्बल २१७ रूग्णांची वाढ तर १६ जणांचा मृत्यू
मुंबई आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
मुंबई : मुंबई महापालिकेनुसार मुंबईत आज तब्बल २१७ रूग्ण वाढले असून गेल्या २४ तासांत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आता कोरोनाच्या रूग्णांची संख्या १३९९ झाली आहे. ज्यापैकी ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १२ तासात मुंबईत ११३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. धारावीत १५ नवे रुग्णांची वाढ झाली असून एकूण ४३ रुग्ण आतापर्यंत येथे आढळले आहेत. तर ४ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
मुंबईतील काही भाग हॉटस्पॉट बनले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. धारावीसारख्या आकाराने मोठ्या आणि दाटीवाटीच्या झोपडपट्टयामध्ये कोरोना शिरल्याने मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
मुंबईत ज्या ठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत त्या विभागाना पालिकेने रेड झोन घोषित केले आहे. आतापर्यंत जी/दक्षिण (वरळी-प्रभादेवी), ई (भायखळा), डी (ग्रँट रोड), के/दक्षिण (अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम) आणि एच/पूर्व (वांद्रे पूर्व), कुर्ला (एल वॉर्ड) आणि मानखुर्द-गोवंडी-देवनार (एम/ई) या विभागांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईत चिंतेचं वातावरण आहे. मुंबईतील धारावीमध्ये देखील परिस्थिती चिंताजनक आहे. आज धारावीत विशेष जंतुनाशक फवारणी मशीच्या सहाय्याने फवारणी करण्यात आली. या मशीन शनिवारी स्वाध्याय परिवाराकडून महाराष्ट्र शासनाला देण्यात आल्या होत्या. मुंबईत एकूण या ५ मशीन देण्यात आल्या असून यामुळे मोठ्या प्रमाणात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.