मुंबई : बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. बुधवारी आज विधानसभेत एक दिवसाचे अधिवेशन बोलवण्यात आले असून राज्यपालांनी हंगामी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली. आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सकाळी 8 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्यासोबतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बहुमत नसूनही राज्यपालांनी सरकार स्थापनेची परवानगी कशी दिली असा प्रश्न विचारत महाराष्ट्रविकासआघाडी म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 


त्यानंतर दोन दिवस सुनावणी होऊन मंगळवारी फडणवीस सरकारला बुधवारीच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला. मात्र अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला. यानंतर आज विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन भरवण्यात आले असून आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राज्यपालांनी मंगळवारी महाराष्ट्रविकासआघाडीला या संदर्भात आदेश दिले. सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत हा सोहळा रंगणार आहे. 


महाराष्ट्रविकासआघाडीच्या नेत्यांना राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीची तारीख बदलण्यात आली आहे. आता त्यांचा शपथविधी २८ नोव्हेंबरला दुपारी पाच वाजता शिवतीर्थावरच पार पडेल. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रविकासआघाडीच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले.