मुंबई : उपरवाला देता है तो छप्पर फाड के देता है, असा अनुभव आज म्हाडाच्या सोडतीदरम्यान तडवी कुटुंबीयांना आला आहे. एकाच कुटुंबातल्या तिघांना म्हाडाच्या सोडतीत तीन घरं लागली. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील 1 हजार 384 सदनिकांची आज सोडत निघाली. या सदनिकांसाठी विक्रमी म्हणजे १ लाख ६४ हजार अर्ज प्राप्त आले होते. अनिता तांबे या यंदाच्या सोडतीच्या पहिल्या विजेत्या ठरल्या. अनुसूचित जाती प्रवर्गातून तांबे यांचं घराचं स्वप्न साकार झालंय. वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाच्या अत्यल्प प्रवर्गासाठी घराची किंमत २० लाख रुपये पर्यंत होती, तर अल्प उत्पन्न गटासाठी २० लाख ते ३५ लाख, मध्यम उत्पन्न गटासाठी ३५ लाख ते ६० लाख आणि उच्च उत्पन्न असलेल्यांसाठी घराची किंमत ६० लाखांपेक्षा जास्त होती. म्हाडाचे सर्वात कमी किंमतीचे घर १४ लाख ६२ हजारापर्यंत होते. तर उच्च उत्पन्न गटातील धवलगिरी कंबाला हिल येथील घराची किंमत सर्वाधिक ५ कोटी ८० लाखांच्या घरात होती.


पुढच्यावर्षी म्हाडाच्या मुंबईतल्या घरांची संख्या दुप्पट होईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे. 
म्हाडा कोकण मंडळाच्या 5000 घरांची जाहिरात जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान येणार आहे. वसई, वेंगुर्ला, मीरारोड, ठाण्यात ही घरं असतील, असंही मेहता यांनी स्पष्ट केलं आहे.