राज्यात ३३२० कोरोनाचे रुग्ण, ३३१ जणांना डिस्चार्ज
महाराष्ट्रासाठी कोरोनाच्या संकटात दिलासा देणारी बातमी. राज्यात शुक्रवारी दिवसभरात केवळ ११८ रुग्ण वाढले.
मुंबई : महाराष्ट्रासाठी कोरोनाच्या संकटात दिलासा देणारी बातमी. राज्यात शुक्रवारी दिवसभरात केवळ ११८ रुग्ण वाढले. तर मुंबईत केवळ १२ नव्या रुग्णांची भर पडली. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ हजार ३२० वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात सातपैकी ५ जण मुंबईतले होते. त्यांना हाय ब्लड प्रेशर, डायबेटीजचाही त्रास होता.
राज्यातल्या कोरोनाबाधित बळींची संख्या २०१ वर पोहोचली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ८५ झाली असून, १२२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने ही दिलासादायक बाब आहे. शुक्रवारी ३१ तर राज्यात आतापर्यंत एकूण ३३१ रुग्ण पूर्णपणे बरे झालेत. या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्याचा विचार करता राज्यात केवळ ११८ रुग्ण वाढले आहेत. ही दिलासा देणारी बाब आहे. कोरोनाची साखळी मोडून काढण्यात यश येत आहे. तर मुंबईत केवळ १२ रुग्ण वाढले असून पुणे महापालिकेच्या क्षेत्रात २९ रुग्ण वाढले आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी कमी रुग्ण
१२ एप्रिल २२१
१३ एप्रिल ३५२
१४ एप्रिल ३५९
१५ एप्रिल २३२
१६ एप्रिल२८६
काल १७ एप्रिल ११८
दरम्यान, मुंबईत धारावीत कोरोनाचे आणखी १५ रुग्ण वाढले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. धारावीत कोरोनाच्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे. आतापर्यंत १०१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळं धारावीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुस्लिमनगरमध्ये सर्वाधिक २१ तर मुकूंदनगरमध्ये १८ रूग्ण आढळलेआहेत.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही कोरोना दाखल झाला आहे . शहापूर येथील एक ६७ वर्षीय व्यक्तीची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीला दम्याचा त्रास होत असल्याने त्यांना ठाणे येथील खासगी रुग्णालायत दाखल करण्यात आले होते , मात्र तिथे त्यांची कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली , आता त्यांना मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते राहात असलेली इमारत आणि परिसर सील करण्यात आला आहे.