मुंबईत १० वर्षात ४८ हजार आगीच्या घटना
आगींमध्ये हजारो मुंबईकरांचे संसार जळून खाक
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबईत आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या आगींमध्ये हजारो मुंबईकरांचे संसार जळून खाक झाले आहेत. तर शेकडो मुंबईकरांचा आगीनं बळी घेतला आहे. मुंबईतल्या आगींच्या मुळाशी गेल्यास बहुतांश आगी या शॉर्टसर्किटमुळे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत गेल्या दहा वर्षांत ४८ हजार ४३४ आगीच्या घटना घडल्या आहेत. यातल्या ३२ हजार ५१६ आगी शॉर्टसर्किटमुळे लागल्या होत्या. ६२९ जणांनी आगीत आपला जीव गमावला आहे.
जुनी वायरिंग आणि विजेच्या तारांवर ओव्हरलोड येणं अशी कारणं शॉर्टसर्किटमागं असल्याचं जाणकार सांगतात. अनेक घरांमध्ये विजेच्य़ा उपकरणांचा लोड जास्त असतो. पण त्या दर्जाचं वायरिंग नसतं. दोन पैसे वाचवण्याच्या नादात बहुतांश घरात कामचलावू इलेक्ट्रिक वायरिंग केली जाते. त्यामुळं आग लागण्याचा धोका वाढतो.
मुंबईकर फायरफायटिंग सिस्टिमबाबत जागरुक नसल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. महापालिकेनं सक्ती केलीय म्हणून फायरफायटिंग यंत्रणा लावल्यात पण त्या शोभेच्या असल्याचं मुंबईकर कबुल करतात.
प्रत्येक मुंबईकरानं खबरदारी घेतली तर मुंबईतल्या आगीच्या घटना रोखता येतील. अन्यथा आगीच्या घटनांमध्ये दुर्दैवी मुंबईकरांचे बळी जातच राहतील.