रिक्षात सापडले बेवारस बाळ, ट्विटरने वाचवले प्राण
ट्विटरचा वापर करुन एका तरुणाने चिमुरड्या मुलीचे प्राण वाचविले आहेत.
मुंबई : चॅटींग, डेटींग अशा अनेक कारणासाठी सोशल मीडियाचा उपयोग केला जातो. पण ट्विटरचा वापर करुन एका तरुणाने चिमुरड्या मुलीचे प्राण वाचविले आहेत.
तरुणाचे कौतुक
लहान मुलगी सापडल्याची माहिती ट्विटरवर दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्या बाळाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या तरुणाचे कौतुक केले जात आहे.
फोटो पोस्ट
रविवारी रात्री अमन नावाच्या तरुणाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तीन ते पाच दिवसांच्या मुलीचा फोटो पोस्ट केला. ही मुलगी बेवारस अवस्थेत सापडल्याचे त्याने यावर लिहिले. या मुलीला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा सल्ला यावेळी अनेकांनी दिला.
प्रतिसाद नाही
मी पोलिसांशी संपर्क साधला पण काही प्रतिसाद मिळाला नाही, दिवसेंदिवस या बाळाची तब्ब्येत खालावत चालल्याचे अमन याने सांगितले.
पोलिसांना ट्विट
दरम्यान एका दुसऱ्या युजरने मुलीचा फोटो मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅंडलला ट्विट केला.त्यानंतर तात्काळ अॅक्शन घेण्यात आली.
महिला पोलिसाकडे सुपुर्द
याच्या काही वेळानंतर अमनने एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये मुंबई महिला पोलीसांच्या हातात ही मुलगी होती.
वैद्यकीय तपासणी
काळजी घेतल्याने या मुलीच्या तब्येतीत सुधारणा दिसून येत आहे. पण वैद्यकीय सल्ल्यासाठी मुलीला सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.