दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. पाच दिवसाचा आठवडा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मक प्रस्ताव तयार करावा आणि तो पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत नुकतीच मुख्य सचिवांकडे एक बैठक पार पडली. राजपत्रित अधिकारी महासंघाबरोबर झालेल्या या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत चर्चा झाली. 


या बैठकीनंतर मुख्य सचिवांनी याबाबत लेखी आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. त्यामुळे येत्या जुलै महिन्यात राज्यातही पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. सरकार याबाबत अनुकूल असल्यामुळे हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आल्यानंतर त्याला मंजुरी मिळेल, अशीही शक्यता आहे.