दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई महापालिकेच्या इमारत विभागात ५० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची एसीबीमार्फत चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. इमारतींना परवानगी देताना झालेल्या या भ्रष्टाचारात महापालिकेचे अनेक बडे अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेमधल्या इमारत विभागातल्या भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कथा महापालिकेत कायमच चर्चिल्या जातात. गेली अनेक वर्षं मुंबईत नगरसेवक असलेले भाजपा आमदार अमित साटम यांनी या भ्रष्टाचाराविरोधात विधानसभेत आवाज उठवला. तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी साटम यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल करून गैरव्यवहार झालेल्या इमारतींची यादीच सादर केली होती. तक्रारीची सत्यता पडताळण्यासाठी आयुक्तांनी चार इमारतींची चौकशी केली. यात चटईक्षेत्राच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या ३९ इमारतींची तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आणि तब्बल ३४ इमारतींच्या बांधकामात अनिमितता आढळून आली आहे. 


विलेपार्ले विकास मंचाच्या तक्रारीवरून लोकायुक्तांनी महापालिका आयुक्तांकडे चौकशी अहवाल मागवली होता. या अहवालाच्या आधारे लोकायुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीचे आदेश दिलेत. 
 
मुंबई महापालिकेतील ही सगळ्या मोठी एसीबी चौकशी असेल. यामुळे महापालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांसह अभियंते आणि इतर अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. रस्ते, नाले सफाईनंतर आता इमारत विभागातल्या या भ्रष्टाचाराचं नवं प्रकरण समोर येण्याची चिन्हं आहेत.