मुंबई : मुंबईतल्या आरे कारशेडसाठी वृक्षतोडीचा वाद ताजा असताना आता पुन्हा मेट्रोसाठी ५०८ झाडं कापली जाणार असल्याचं पुढं आलं आहे. एमएमआरडीएच्या मेट्रो-२ अ प्रकल्पासाठी झाडे तोडावी लागणार असून, या वृक्षतोडीबाबत शिवसेना कोणती भूमिका घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. येत्या शुक्रवारी वृक्षतोडीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. ५०८पैकी १६२ झाडे मुळापासून कापण्यात येणार असून, ३४६ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. पुनर्रोपणाचा आत्तापर्यंतचा अनुभव लक्षात घेता ३४६ झाडांचे भवितव्य कसे कसेल याविषयीही पर्यावरणप्रेमींना शंका आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडणवीस सरकारच्या काळात आरेमधील झाडे मेट्रो कारशेडसाठी कापण्यात आल्यामुळे शिवसेनेने याला उघड विरोध केला होता. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या मुद्द्यावर आवाज उठवला होता. त्यानंतर ठाकरे सरकार येताच आरेमधील कारशेडचं काम थांबवण्यात आलं होतं. पण आता पुन्हा मेट्रो प्रकल्पासाठी ५०८ झाडं तोडण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.


मेट्रो मार्गात येणारी ही झाडं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. याबाबतचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून यावर आता काय निर्णय होणाय याकडे लक्ष लागलं आहे.