राज्यात ७८२७ कोरोना रुग्ण वाढले; तर १७३ जणांचा मृत्यू
आज दिवसभरात राज्यात 3340 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
मुंबई : देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 7827 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 54 हजार 427 इतकी झाली आहे.
सध्या राज्यात एकूण 1 लाख 3 हजार 516 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होऊन ते घरी जाण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब आहे. आज दिवसभरात राज्यात 3340 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 325 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.15 टक्के इतकं आहे.
गेल्या 24 तासात राज्यात 173 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10 हजार 289 इतकी झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 4.04 टक्के इतका आहे.
सध्या राज्यात 6 लाख 86 हजार 150 लोक होम क्वारंटाईन असून 47 हजार 801 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत एका दिवसात 1263 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 44 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 92 हजार 720 झाली असून 5285 जण दगावले आहेत. तर 64 हजार 872 जण कोरोनातून बरे झाले आहेत.