मुंबई : 'बेस्ट' कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. बेस्टच्या बसवर भिस्त असणाऱ्या लाखो प्रवाशांचे हाल सुरू आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊ शासनाने संप मिटवला पाहिजे, अशी भावना प्रवासी व्यक्त करत आहेत. या संपात प्रवाशांच्या मदतीसाठी एसटी प्रशासनानं मुंबईत बसच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. दुसरीकडे, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचं आश्वासन मी दिलं होतं. ते नक्कीच पूर्ण करू असं सांगत एकत्रित बसून चर्चा केली तरच मार्ग निघेल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसंच बजेटचं विलीनीकरण करण्याचं आश्वासन मी दिलं होतं ते पूर्ण करू, असंही आश्वासन बेस्ट कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकमेकांवर आरोप करू काहीही साध्य होणार नाही. मान्यता प्राप्त युनियन आणि प्रशानाने केलेल्या करारानुसार कर्मचाऱ्यांना वेतन मिळतंय. बेस्टची आर्थिक स्थिती खराब आहे. बेस्टची तिजोरी रिकामी आहे. या संपात मला राजकारण करायचं नाही. मात्र अवाजवी मागण्या केल्या तर अजून समस्या निर्माण होतील, असेही ते यावेळी म्हणाले. खासगीकरण हा अंतिम पर्याय नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबईत मांडली. बेस्टच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. उच्च न्यायालयातील आजच्या निर्णयावर बेस्ट संपाचं भवितव्य अवलंबून आहे.


बेस्टच्या खाजगीकरणावर उद्धव ठाकरे म्हणतात...


खाजगीकरण जरी करायचा विचार समोर आला तरीही मालकी हक्क आम्ही जाऊ देणार नाही... संपूर्ण खाजगीकरणं होऊ देणार नाही झालं तर फक्त काही बस गाड्याचा असू शकेल. पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, अशीही पुश्ती त्यांनी यावेळी जोडलीय.


भाजपचा टोला


दुसरीकडे, घरात बसून कोणी काहीही बोलेलं तरी अंतिम निर्णय खुर्चीवर बसलेले मुख्यमंत्रीच घेणार असा टोला भाजपा आमदार सरदार तारासिंग यांनी बेस्ट संपाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तर बेस्ट आगाराचे भूखंड खासगीकरणातून मोकळे करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे.