मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर सरकारनं जिल्हानिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. पण या यादीवरून आता गोंधळ सुरु आहे. मुंबई शहरातल्या ६९४ आणि मुंबई उपनगरातल्या ११९ अशा एकूण ८१३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. पण मुंबईमध्ये शेतकरी कुठून आले असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच या शेतकऱ्यांची नावंही जाहीर करण्यात यावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान मुंबईमध्ये एवढे शेतकरी आहेत का असा प्रश्न मलाही पडला होता, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच आता जाहीर केलेल्या यादीमधले लाभार्थी प्रस्तावित आहेत. या सगळ्याची पूर्ण चौकशी केल्यानंतरच कर्ज माफ केलं जाईल, असं मुख्यमंत्री म्हणालेत.


बॅंकि़ग समितीच्या आकडेवारीत मुंबई शहर आणि उपनगरातील थकीत शेतक-यांची आकडेवारी नाही. मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत मुंबईतील शेतकरी आले कसे, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. मुंबईतल्या या शेतक-यांची नावं जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाली आहेत. या शेतकऱ्यांची जमीन मुंबईलगत असू शकते. तसंच त्यांनी राष्ट्रीयकृत बंकेतून कर्ज घेतलं असू शकेल, अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी वर्तवली आहे.


कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची आकडेवारी खोटी असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा निहाय कर्जमुक्तीच्या लाभार्थींची आकडेवारी जाहीर केली. यादीनुसार सर्वाधिक लाभार्थी बुलडाणा जिल्ह्यात असून त्या खालोखाल यवतमाळ जिल्हात सरकारी कर्जमुक्तीच्या योजनेचे लाभार्थी आहेत.


लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी