कृष्णात पाटील, मुंबई : मदर ऑफ ऑल पेन म्हणून ओळखल्या जाणा-या ट्रायजेमिनल न्यूराग्लिया या आजारात इतक्या तीव्र वेदना होतात की, या आजारास आत्महत्येस प्रवृत्त करणारा आजार म्हणूनही ओळखले जाते. पण यावर रेडिओ सर्जरीद्वारे वेदनारहित उपाय शक्य झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आजाराचा सामना करणा-या 83 वर्षीय रुग्णावर मुंबईत अवघ्या 23.7 मिनिटांमध्ये रेडिओ शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी वेळेत अशा प्रकारची रेडिओ शस्त्रक्रिया पार पडली


पुण्याचे रहिवाशी असणारे हे आहेत इब्राहिम खान. केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ऊर्वरीत आयुष्य तरी शांततादायी, आरोग्यदायी जाईल असं वाटतं असतानाच 15 वर्षापूर्वी त्यांना त्यांच्या चेह-यावर वेदना सुरु झाल्या. बरेच डॉक्टर झाले, बरेच इलाज झाले पण वेदना काही कमी झाल्या नाहीत. गेल्या 3 वर्षांपासून तर चेह-याच्या डाव्या बाजूला मरणाप्राय वेदना सुरु झाल्या. 


चेहऱ्याला स्पर्श झाला, मान हलवली किंवा चेहऱ्यावर हास्य आणले तरी ट्रायजेमिनल न्यूराग्लिया नावाच्या आजारात वेदना सुरु होतात. इब्राहिम खान यांचेही तसंच झालं. ते तर डोक्यावर टोपीही घालत नव्हते. पण त्यांचं वय लक्षात घेता सर्जरी करणंही अवघड होते. त्यामुळं एचसीजी अपेक्स कॅन्सर सेंटरचे डॉ शंकर वंगीपुरम यांनी त्यांच्यावर शस्त्राचा वापर न करता रेडिओ सर्जरी करण्याचा निर्णय घेत ती यशस्वीही केली. यामुळं इब्राहिम खान आता सामान्य आयुष्य जगू लागलेत.


डोक्याला रक्तपुरवठा करणारी एखादी रक्तवाहिनी दबल्या गेल्यामुळं किंवा धमन्या आक्रसल्या गेल्यामुळं ट्रायजेमिनल न्यूराग्लिया आजार होवू शकतो. महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. भारतात दर 1 लाख महिलांमागे 5.7 महिलांना तर 1 लाख पुरुषांमागे 2.5 पुरूषांमध्ये या आजाराचे प्रमाण आहे. 


म्हणजे सरासरी एक लाख लोकसंख्येमागे 4 जणांना हा आजार असून महाराष्ट्रात सुमारे तीन हजार जण या आजाराने त्रस्त आहेत. या आजारावर रेडीओ सर्जरी केल्यास रुग्ण बरा होण्याचे प्रमाण 90 टक्के इतके आहे. यासाठी येणारा खर्च आहे सुमारे 3 लाख रुपये. 


ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सरासरी 25 ते 90 मिनिटांपर्यंत वेळ लागतो. पण एचसीजी अपेक्स कॅन्सर सेंटरचे डॉ शंकर वंगीपुरम यांनी मात्र अवघ्या 23.7 मिनिटांत ही रेडिओ सर्जरी केलीय. जी आतापर्यंतची सर्वात कमी वेळ असल्याचा दावा केला जातोय.


ट्रायजेमिनल न्यूराग्लिया आजारावर उपचार करण्यासाठी अनेक प्रकारच्या न्यूरोसर्जिकल उपचारपद्धतीही उपलब्ध आहेत. परंतु रेडिओ सर्जरीमध्ये शरीरावर साधा व्रणही पडत नाही तसंच रुग्णाला भूल देण्याचीही गरज पडत नाही.