९८ व्या नाट्य संमेलनाचं उद्घाटन, नेत्यांची टोलेबाजी
९८ व्या नाट्य संमेलनाचं उद्घाटन मुलुंडमध्ये झालं.
मुलुंड : ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं मुंबईतल्या मुलुंडच्या कालिदास कलामंदिरात ज्येष्ठ रंगमंच कामगार उल्हास सुर्वे यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून उदघाटन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडेयांच्या प्रमुख उपस्थितीत नाट्यसंमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी तावडे, राज आणि पवार यांनी जोरदार टोलेबाजी करत उदघाटन सोहळ्यात रंगत आणली.
मुंबई उपनगरात २५ वर्षांनी हे संमेलन होत आहे. सलग तीन दिवस ६० तास विविध कार्यक्रमांचे आयोजन हे यंदाच्या नाट्य संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. आज सकाळी मराठी बाणा या कार्यक्रमाने याचा प्रारंभ झाला. तर दुपारी ४ वाजता निघालेल्या नाट्य दिंडीने या संमेलनाची शोभा वाढवली..तब्बल ४०० पेक्षा जास्त रंगकर्मी या नाट्यदिंडीत सहभागी झाले होते. मराठी बाणा या कार्यक्रमाला सकाळीच रसिकांनी चांगलीच गर्दी केली होती. तीन दिवस रसिकांसाठी विविध कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे.