पावसाळ्यात अनेक आजार डोकं वर काढत असून डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र अनेकदा लोक बरं वाटत नसेल किंवा ताप आला असेल तरीही डॉक्टरांशी संपर्क साधत नाहीत. पण हा दुर्लक्षपणा जीवावर बेतू शकतो. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला येथे एका मुलाला तापाकडे दुर्लक्ष केल्याने जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे, मुलाला एकाचवेळी  डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस यांची लागण झाली होती. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा करुनही त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत. डॉक्टरांनी हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महिन्याच्या सुरुवातीला मुलाला ताप आला होता. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष गेलं. मुलगा डॉक्टरकडे गेलाच नाही. याउलट त्याने एका स्थानिकाडून उपचार घेतले. जवळपास आठवडाभर तो त्याच्याकडून उपचार घेत होता. 


यानंतर 14 ऑगस्टला त्याने सरकारी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली. रुग्णालयात चाचण्या करण्यात आल्या असता,  त्याला डेंग्यू आणि मलेरिया दोन्हींची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. आश्चर्याची बाब म्हणजे, अतिरिक्त चाचण्या करण्यात आल्या असता त्याला लेप्टोस्पायरोसिसची लागणही झाली असल्याचं समोर आलं. 


यादरम्यान, मुलाची प्रकृती आणखी ढासळली. यानंतर मुलाला नायर रुग्णालयात हलवण्यात आलं. मुलाला फुफ्फुसाचा गंभीर त्रास झाल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.  त्याला तीव्र श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्याच्या क्रिएटिनिनची पातळीही जास्त होती, असं रिपोर्टमधून समोर आलं आहे. 


डॉक्टरांनी मुलाचा जीव वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. पण संसर्ग झाल्याने आणि बरेच अवयव निकामी झाल्याने अखेर मुलाचा मृत्यू झाला. तीन दिवस रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. 


वरिष्ठ डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाचवेळी तिन्ही रोगांची लागण होणं हे अशक्य नाही. पण अशी प्रकरणं ही फार दुर्मिळ आहेत हेदेखील खरं आहे. जर मुलाने लवकर वैद्यकीय मदत घेतली असती तर त्याचा जीव वाचला असता असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. 


मुंबई महापालिकेच्या पावसाळी अहवालानुसार, ऑगस्ट महिन्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पालिकेने मलेरियाच्या 959 आणि लेप्टोस्पायरोसिसच्या 265 रुग्णांची नोंद केली आहे.