Thackeray group march: मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेत्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेवक हाजी हालीम खान, माजी नगरसेवक सदा परब, शाखाप्रमुख संतोष कदम आणि शाखाप्रमुख उदय दळवी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर माजी नगरसेवक हाजी हालीम खान यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. मारहाण झालेल्या पालिका अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर खार पोलिसांत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. शिवसेनाशाखा तोडल्याप्रकरणी ठाकरे गटाने एच पूर्व वॅार्ड ॲाफिसवर सोमवारी काढला मोर्चा होता. यावेळी वॅार्ड ॲाफिसरच्या कार्यालयात एका मुंबई महापालिका अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या सांताक्रूझमध्ये ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चा काढला होता. मुंबई महापालिकेच्या एच पूर्व प्रभाग कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.अनियमित, अपुरा पाणीपुरवठा, दूषित पाणी यासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. पण अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या प्रश्नावर मार्ग निघाला नाही. यामुळे संतापलेल्या महिलांनी महापालिकेच्या ऑफिसवर धडक दिली. यावेळी पालिका अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली होती.


उद्धव ठाकर यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'पासून काही अंतरावरच असलेल्या ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने हातोडा मारला. वांद्रेतील शिवसेनेची ही 44 वर्ष जुनी शाखा होती. शिवसेनेचे कार्यालय जमीनदोस्त केल्याने ठाकरे गट संतप्त झाला आहे.  शाखेत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असतानाही शाखेवर कारवाई केल्याने राग व्यक्त केला जात होता. याप्रकरणी निवदेन देण्यासाठी ठाकरे गट वॉर्ड ऑफिसला गेले होते. यासाठी ठाकरे गटाचं एक शिष्ठमंडळ वॉर्डात गेले यात अनिल परबही होते.  



माजी मंत्री अनिल परबांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. स्थानिकांच्या प्रश्नावर आम्ही मोर्चा घेऊन आलो आहोत. आम्ही पालिका प्रशासनाला पंधरा दिवसांचा वेळ देतोय, स्थानिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं, असी मागणी अनिल परब यांनी यावेळी केली. 15 दिवसात स्थानिकांचा प्रश्न सोडवला नाही तर अधिकाऱ्यांच्या घरचे पाणी आम्ही तोडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच जो कचरा विभागात साठेल तो कचरा अधिकाऱ्यांच्या घरासमोर नेऊन टाकू, मग त्यांना सामान्य शिवसैनिकांचा आणि नागरिकांचा दुःख कळेल, असेही यावेळी ठणकावण्यात आले होते.