ऑनलाइन फूड सर्व्हिसच्या माध्यमातून ऑर्डर दिल्यानंतर अनेकदा त्या जेवणाचा दर्जा नीट नसल्याचं किंवा त्यात काहीतरी सापडल्याचे फोटो, व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण मुंबईतील एका ग्राहकाला अत्यंत वाईट अनुभव आला आहे. याचं कारण त्याला ऑर्डर केलेल्या जेवणात चक्क औषधाची गोळी सापडली आहे. ही गोळी पाकिटासहित होती. या ग्राहकाने एक्सवर पोस्ट शेअर करत हा धक्कादायक प्रकार उघड केला. यानंतर पोस्ट व्हायरल झाली असून, नेटकरी त्यावर व्यक्त होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उज्वल पुरी यांनी एक्सवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्याला आलेला अनुभव सांगितला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "मी ख्रिसमस सरप्राईजसाठी मुंबईच्या कुलाब्यातील लिओपोल्ड येथून स्विगीच्या माध्यमातून मागवलेल्या जेवणात अर्धे शिजवलेले औषध मिळाले". पुरी यांनी ऑयस्टर सॉसमध्ये शिजवलेलं चिकन ऑर्डर केलं होतं.



ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर स्विगीने उज्वल पुरी यांच्या पोस्टला उत्तर दिलं आहे. कंपनी डीएमच्या माध्यमातून तुमच्या संपर्कात राहील असं त्यांनी म्हटलं आहे. 



दरम्यान या पोस्टवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेकांनी लिओपोल्ड कॅफेची सेवा आणि दर्जा आता पहिल्यासारखा राहिलं नसल्याकडे लक्ष वेधलं. दरम्यान एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे की, "स्विगी हा काय प्रकार आहे, तुम्ही अर्धे शिजवलेलं औषध पाठवता. किमान रेस्तराँला जेवण नीट तयार करायला सांगा".


तर एकाने लिहिलं आहे, स्विगी तुम्ही डिलिव्हरी करण्याआधी सर्व पदार्थ चेक करा आणि त्याची चवही चाखा. 


"लिओपोल्ड कॅफे गेल्या काही वर्षांपासून दयनीय आहे! सर्व काही अस्वच्छ आहे - जागा, अन्न, स्वयंपाकघर, कर्मचारी, वातावरण आणि अगदी फर्निचर. कृपया स्विगीच्या डिलिव्हरी बॉयला सूट द्या. तो मेसेंजर होता, त्याच्यावर कारवाई करु नका," असं एका युजरने लिहिलं आहे. 


अलीकडच्या काही दिवसांत, ग्राहकांना त्यांच्या अन्नामध्ये इतर पदार्थ आढळून आल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या महिन्यातच, बंगळुरूच्या रहिवाशाला स्विगीद्वारे ऑर्डर केलेल्या सॅलडमध्ये एक जिवंत गोगलगाय सापडली होती. त्याचप्रमाणे, विविध शहरांमधील ग्राहकांनी रेस्तराँमधून ऑर्डर केलेल्या जेवणात झुरळं, सरडे आढळल्याचं नोंदवलं होतं.